वाशिम : स्वत: वर होत असलेला अन्याय, सभोवताल घडत असलेल्या अनुचित प्रकारांची माहिती तत्काळ पोलिसांपर्यंत पोहचण्यासाठी आता एकमेव ११२ हा हेल्पलाईन क्रमांक १६ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. हा नंबर डायल केल्यानंतर अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी हजर होतील, असे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी २५ इमर्जन्सी रिस्पॉन्स व्हेईकल सज्ज करण्यात आल्या आहेत. या वाहनांवर मोबाइल डाटा टर्मिनल जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार आहे.
वाशिम जिल्ह्यात १६ सप्टेंबरपासून सुरूवात -
जिल्ह्यात एकूण १३ पोलीस स्टेशन आहेत. त्यात ९२ अधिकारी व १३९८ अंमलदार कार्यरत आहेत. दरम्यान, या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास त्यांना आता ११२ हा हेल्पलाईन क्रमांक डायल करावा लागणार आहे. विशिष्ट यंत्रणेच्या साहाय्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कोठून आला, हे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना कळणार आहे. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना एकाचवेळी त्या कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊ शकतील. आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला असून या प्रकल्पास वाशिम जिल्ह्यात १६ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. नागरिकांना आता १०० ऐवजी ११२ या क्रमांकावर पोलिसांकडून मदत मागावी लागणार आहे.