वाशिम - जिल्ह्यात एकमेव कोरोनाबाधित रुग्णाला काल डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी लॉकडाऊन शिथिल झाले असे गृहीत धरून भाजी मार्केटमध्ये तुंबड गर्दी केली. या भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचा चांगलाच फज्जा उडवल्याचे दिसून आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता देण्यात आली नसल्याचे सांगूनदेखील नागरिकांनी भाजीमार्केटमध्ये चांगलीच गर्दी केली होती. त्यामुळे नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम असेच पायदळी तुडवले तर येत्या काही दिवसात याचे गंभीर परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतील. नागरिकांनी जबाबदारीने वागत प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.