वाशिम - आज वाशिम येथे काँग्रेसचा संवाद मेळावा होता. या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होती. यावेळी पटोले यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. सभेत पटोले यांनी उपस्थितांना दादा मोठा की नाना मोठा? असा प्रश्न केला होता. यावर पत्रकारांनी विचारले असता, दादा आपण मुलाला म्हणतो आणि नाना आपण आईच्या वडिलांना म्हणतो. ही आपल्या महाराष्ट्रातील एक परंपरा आहे, त्याच्यावर मी बोललो, कोणावरही टीका केलेली नाही, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.
हेही वाचा - वाशिम : लाडेगावाच्या शेतकरी पुत्राचा कृषिमंडळ अधिकारी ते युपीएससी असा प्रवास; मिळवला 476वा रँक
पक्षांनी महाराष्ट्राची परंपरा राखली
रजनी पाटील यांच्या अविरोध निवडून आल्यावर पटोले म्हणाले की, ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे. मी महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांच्या नेत्यांचा धन्यवाद करतो की, त्यांनी महाराष्ट्राची ही परंपरा कायम ठेवण्यामध्ये आम्हाला सहयोग केला आणि त्या माध्यमातून रजनी पाटील या बिनविरोध निवडून आल्या. मी रजनी पाटील यांना शुभेच्छा देतो.
इशाऱ्याचा उद्देश माहीत नाही
संजय राऊत यांनी अजित पवारांना दिलेल्या इशाऱ्याबद्दल विचारले असता पटोले म्हणाले की, त्यांच्या इशाऱ्या मागचा उद्देश मला काही माहीत नाही. उद्देश माहीत झाला तर, निश्चितपणे मी त्याच्यावर बोलेल.
केंद्राकडून इडीचा दुरुपयोग
पत्रकारांनी नाना पटोले यांना आनंदराव अडसूळवरील ईडीच्या कारवाईबद्दल विचारले, त्यावर भाजपने केंद्रामध्ये बसून ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करायला सुरुवात केली आहे, त्याचीच परिणिती आज देश भोगत आहे. केंद्रामध्ये बसलेल्या भाजप सरकारच्या विरोधात जो बोलेल त्याच्यावर खोटे आरोप करून त्याच्यावर ईडी आणि सीबीआय या व्यवस्थेचा दुरुपयोग करून कारवाई करणे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, हा प्रयत्न ते करत आहे. त्याच्यामुळे आनंदराव अडसुळांवर जी काही आता ईडी लागलेली असेल, त्याला घाबरण्यासारखे काही नाही, असे नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा - वाशिम : दुहेरी हत्याकांडातील आरोपींना ठोकल्या बेड्या; वाशिम पोलिसांची कारवाई