वाशिम - शहरातील लाखाळा परिसरातील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या वैष्णवी जाधव बेपत्ता प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता मालेगाव तालुक्यातील इरळा शिवारात निर्जनस्थळी तिचा मृतदेह आधी जाळला व दुसऱ्या दिवशी उर्वरित अवयव, जे जळाले नाहीत ते पुरून ठेवल्याची माहिती आरोपींनी दिली. यावरून पोलिसांनी तो पुरलेला मृतदेह काढून ताब्यात घेतला आहे.
इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी वैष्णवी जाधव ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी २० जानेवारी २०२० रोजी पोलिसांकडे दिली होती. पोलिसांनी त्याचा कसोशीने तपास केला, मात्र कुठलाही सुगावा हाती लागत नव्हता. तपासासाठी दोन वेगवेगळी पथके सुद्धा तयार करण्यात आली. मात्र, तरीही पोलीस तपासात काहीच निष्पन्न होत नव्हते. त्यावर आक्रमक होत काही संघटनांनी पोलिसांविरोधात मोर्चा सुद्धा काढला होता. मात्र, आता तब्बल नऊ महिन्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. वैष्णवीची हत्त्या केल्याच्या आरोपावरून नातेवाईकांना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - वाशिमकरांनो सावधान..! मास्क न घालता बाहेर पडल्यास ५०० रुपयांचा बसणार भुर्दंड