वाशिम - जिल्ह्यातील मानोरा तहसील कार्यलयातील दोन कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. यानंतर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, दोन्ही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून आपली कोरोना तपासणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून पुढील 10 दिवसांसाठी मानोरा तहसील कार्यालय बंद करण्यात आले आहे. मागील दोन महिन्यात मानोरा तहसील कार्यालय कोरोना संसर्गामुळे दुसऱ्यांदा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यात दोन वेळा मानोरा तहसील कार्यालय दहा दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याची वेळ आल्याने प्रशासनाच्यावतीने नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. दरम्यान, मानोरा तहसील कार्यालय बंद असल्यामुळे परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे, नियमांचे पालन करण्याचे, बाहेर पडताना मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतरच; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण