वाशिम - जिल्ह्यातील तपोवन येथील शेतकरी गोपाल येवले यांनी एक एकरात उन्हाळी काकडीची लागवड केली होती. मात्र, काकडीचे पिक विक्रीसाठी तयार झाले आणि त्यातच कोरोनाचे संकट आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे काही ठिकाणी बाजार आणि वाहतुक बंद झाली. त्यातच काकडीला उपलब्ध बाजारात दर मिळत नसल्याने हताश झालेल्या या शेतकऱ्याने अखेर आपल्या काकडीच्या शेतात जनावरे सोडली. तसेच शेतात टॅक्टर फिरवून सगळे पीक काढून टाकले.
हेही वाचा... राज्यातील घरवापसी : गावी जाणाऱ्यांसाठी 'लालपरी'ची मोफत सेवा, सरकारने तयार केले पोर्टल
गोपाल येवले या शेतकऱ्याला काकडी पिकासाठी सुमारे 50 हजार रुपये लागवड खर्च आला होता. काकडीचे उत्पादनही चांगले आले होते. मात्र, विक्री न झाल्याने आणि योग्य भाव मिळाला नसल्याने हा खर्च देखील वसूल झाला नाही. त्यामुळे जवळपास दोन लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याचे येवले यांनी सांगितले आहे. जिल्हा प्रशासन, राज्य सरकारने आमच्या सारख्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील येवले दरवर्षी उन्हाळी काकडीची लागवड करतात. काकडीपासून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळते. यावर्षी मात्र काकडी तयार होऊनही विक्रीला नेता आली नाही. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. त्यातच बाजारात पिक नेले तर योग्य दर मिळत नाही, त्यात पुन्हा पोलिसांचा त्रास होतो, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.