वाशिम - जिल्ह्यात मागील दोन दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक नदी नाल्याला पूर आला होता. काल सायंकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पूर ओसरत आहे. मात्र काल आलेल्या पुरामुळे मानोरा तालुक्यातील कोंडोली येथील अरुणावती नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे कोंडोली, हिवरा, पारवा, असोला खुर्द आणि मोहगव्हान या गावाचा मानोरा शहराशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी या गावातील नागरिक करत आहेत.
अरुणावती नदीवरील पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने खरीप पिके संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसत असून पावसाची रिपरिप सुरु असल्याने तण व्यवस्थापन व कीड नियंत्रणात खोळंबा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात जून महिन्यात सुरुवातीपासूनच दमदार पाऊस पडू लागल्याने शेतकरी सुखावला होता. मान्सूनपूर्व पावसाच्या आधारेच जिल्ह्यात सारिपाच्या पेरण्यांनी वेग धरला होता. त्यानंतर पेरणीकरूनही पावसाने दडी मारल्याने शेतीपिके संकटात होती. ग्रामीण भागात पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करण्यात आली होती. तीन दिवसात अनेक भागात सतत पाऊस पडल्याने शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात ओल निर्माण झाली आहे. याचा पिंकावर विपरीत परिणाम होत आहे.
हेही वाचा -गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी धोकादायक प्रवास करत घेतला पूरस्थितीचा आढावा