वाशिम - वीज वितरण कंपनीने टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांना व सर्वसामान्य व्यक्तींना अवाजवी बिल देऊन सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक ग्राहकांच्या तक्रारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे वाढीव वीज बिल कमी करून शेती पंपाचे वीजबिल माफ करावे, यासाठी आज गोरसेना कारंजा शाखेच्यावतीने सहायक अभियंता यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
टाळेबंदीच्या काळात महाआघाडी सरकारने नागरिकांना वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र, आता राज्य सरकारला त्याचा विसर पडल्याचा आरोप करत आज गोर सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
टाळेबंदीच्या काळातील घरगुती विजेचे तीन महिन्यांचे बील सरकारने माफ केलेच पाहिजे. सरकारकडे त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. टाळेबंदीच्या काळातील वीजेचे बिल सामान्य माणूस कोणत्याही परिस्थितीत भरणार नाही. दरम्यान, वीज बिल माफ करून, वीज तोडणी थांबवावी अन्यथा यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.