वाशिम - शाळेचा निर्गम उतारा मिळण्यास उशीर होत असल्याने रागावलेल्या एका माजी विद्यार्थ्याने शाळेच्या मुख्याध्यापकावर देशी कट्ट्याने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील अमाणी येथील जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली. याच शाळेतील एका शिक्षकाने आपल्याकडील मुख्याध्यापकाचा प्रभार काढल्याचा वचपा काढण्यासाठी या माजी विद्यार्थ्याला कट्टा खरेदीसाठी पैसे दिल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. शिक्षण क्षेत्रात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
मालेगाव तालुक्यातील अमाणी येथील 22 वर्षीय सुशांत खंडारे हा युवक स्थानिक जिल्हा परिषदेच्या शाळेचा माजी विद्यार्थी असून त्यास शाळेत शिकत असल्याचा निर्गम उतारा पाहिजे होता. त्यासाठी त्याने अर्जही दिला होता. मात्र, उतारा मिळण्यास उशीर होत असल्याचे कारण पुढे करीत त्याने मुख्याध्यापक विजय बोरकर आणि इतर शिक्षक कार्यालयात असतांना हातातील कट्टा शिक्षकांकडे फिरवित धमकावले व त्यातील गोळी झाडली. मात्र, ही गोळी बाजूला असलेल्या कापटाला लागली आणि मुख्यध्यापक बचावले.
शाळेच्या कार्यालयात झालेल्या या गोळीबारामुळे शिक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर आरोपी सुशांत खंडारे कट्टा तिथेच टाकून पळून गेला. त्यानंतर पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले व इतरांनी आरोपीला अटक केली आहे.
याप्रकरणी अधिक चौकशी केली असता, याच शाळेत कार्यरत असलेले गजानन इंगळे यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापकाचा प्रभार होता. मात्र, त्यांच्याकडील हा प्रभार काढून विजय बोरकर या शिक्षकाकडे देण्यात आल्याने गजानन इंगळे यांच्या मनात द्वेष भावना तयार झाली होती. त्यामुळे गजानन इंगळे यांनी आरोपी सुशांत खंडारे यास कट्टा खरेदीसाठी 40 हजार रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.