वाशिम - शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग लागून तूर, कुटार व शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना कारंजा तालुक्यातील ब्राह्मणवाडा शेतशिवारात घडली. यात शेतकऱ्याचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
कारंजा तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील शेतकरी मंगेश अरुणराव मुंदे यांच्या शेतात गोठा आहे. त्या गोठ्यात सुमारे 20 ट्रॉली कुटार, 15 क्विंटल तुरीच्या पेंड्या, एक स्प्रिंकलर संच यासह शेतीउपयोगी साहित्य ठेवले होते.
दरम्यान, मुंदे यांच्या शेतापासून काही अंतरावरील एका शेतात विजेच्या आग शॉर्टसर्किटमुळे ठिणगी पडून आग लागली. ती आग हळुहळु मुंदे यांच्या शेतातील गोठ्यापर्यंत पोहोचली आणि क्षणात आगीने गोठ्यातील साहित्य आपल्या कवेत घेतले. आग लागल्याची माहिती मिळताच मंगरूळपीर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमनदल व स्थानिक रहिवाशांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा - बिल भरूनही वीजेपासून वंचित; शेतकऱ्यांकडून टॅक्टरने पिकाला पाणी
हेही वाचा - वाशिम : शंभर वर्षीय आजोबांनी केली कोरोनावर मात