वाशिम - जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक सुरू असून, आजूबाजूच्या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातही लॉकडाऊन लागेल या भीतीने शेतकरी सोयाबीनसह इतर शेतमाल विकण्यासाठी बाजारात गर्दी करीत आहेत.
मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार उपबाजार समिती मध्ये शेतमालाची आवक वाढत असल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने हमाल, मापारींची संख्या वाढवून लवकरात लवकर शेतमाल मोजून घ्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
गेल्या वर्षी प्रमाणे माल घरी पडून राहण्याची भीती-
वाशिम जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यासाठी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनां म्हणून निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहे. सध्या शेतमाल काढणीला वेग आला आहे. मात्र, काढलेला शेतमाल वेळेत बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. कारण गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही लॉकडाऊन लागला तर शेतमाल घरातच पडून राहील, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे शेलुबाजार परिसरातील शेतकरी आपला माल विकण्यासाठी उपबजार समितीतत मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.