वाशिम - कारंजा तालुक्यातील बेंबळा येथील शेतकरीपुत्र विशाल देवेंद्र ठाकरे याने स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहिले आहे. अवकाळी पावसामुळे झालेली शेतकऱ्यांची दैना त्याने स्वत:च्या रक्ताने लिहून मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. या सोबतच कारंजा तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करण्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणीही केली आहे. रक्ताने लिहिलेले पत्र कारंजा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविले आहे .
सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या सोयाबीन, कापूस या पिकांचे प्रचंड तालुक्यात प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. पावसाने तुरीसह इतर पिकांची अवस्थाही वाईट केली आहे. शेतकऱ्यांना आता उत्पादनाची कुठलीच हमी राहिली नाही. त्यामुळे या बिकट परिस्थितीत शेतकरी पूर्णतः खचला आहे. विशाल यांनी शेतकऱ्यांची ही व्यथा आपल्या रक्ताने पत्रात नमूद करीत कारंजा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविले आहे.