वाशिम - वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदाच मतदान प्रक्रियेला सामोरे जात असलेल्या नव मतदारांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या कार्यपद्धतीविषयी माहिती व्हावी, याकरिता जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत राजस्थान आर्य महाविद्यालयात मंगळवारी अभिरूप मतदान घेण्यात आले. फिरत्या अभिरूप मतदान केंद्रामध्ये हे मतदान पार पडले. ‘स्वीप’ अंतर्गत आयोजित या उपक्रमाला जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी उपस्थित राहून नवमतदारांनी येणाऱ्या २१ ऑक्टोंबरला मतदान करण्याचे आवाहन केले.
हे ही वाचा - ईव्हीएम हटवा : विधानसभा निवडणुका बॅलेटवर घ्या, आझाद मैदानात आंदोलन
यावेळी २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या अभिरूप निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेवून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या कार्यपद्धतीविषयी माहिती जाणून घेतली. मतदार यादीमध्ये नाव नोंदवून मतदानास पात्र झालेल्या प्रत्येक नवमतदाराने येणाऱ्या २१ ऑक्टोंबरला विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावावा. तसेच आपल्या कुटुंबातील प्रत्येक मतदार मतदान करील यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
हे ही वाचा - जालना जिल्ह्यात 'ईव्हीएम' मशीन निवडणूक अधिकाऱ्यांकडे करणार सुपूर्द