वाशिम - भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमैया यांनी खासदार भावना गवळी यांनी शंभर कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप वाशिम येथील पत्रकार परिषदेत केला होता. यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानुसार आज (सोमवार) सकाळी ईडीचे पथके त्या चौकशीसाठी वाशिम जिल्ह्यात दाखल झाले होते. सकाळपासून साई डोमेस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, साई भूमी कन्स्ट्रक्शन, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, साईस्थान डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, दानिश इन्टरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेडमधील विविध दस्तऐवजाची सोमवारी 11 वाजतापासून तपासणी सुरू होती. सोमवारी सायंकाळचे 8 वाजतापर्यंत ईडीचे अधिकारी व कर्मचारी चौकशी करत होते. अजूनही चौकशी बाकी आहे का? याबद्दल अधिकारी यांनी बोलण्यास नाकार दिला आहे. भावना गवळी यांच्यावरील आजची कारवाई संपली असून उद्या (मंगळवार) पून्हा चौकशी होते का? हे बघावे लागणार आहे.
सोमैयाच्या आरोपानंतर ईडीचे छापे -
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी 2019 मध्ये चोरीला गेलेल्या सात कोटी रुपयांची चोरीची तक्रार 2020 मध्ये दिली. मात्र, सात कोटी रुपये आले कुठून? असा प्रश्न भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे. सोबतच खासदार भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्या संदर्भात केलेल्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही सोमैया यांनी केला होता. आज खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर ईडीचे अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता.
या पाच ठिकाणी ईडीची चौकशी सुरू -
- साई डोमेस्टिक प्रायव्हेट लिमिटेड
- साई भूमी कन्स्ट्रक्शन
- महिला उत्कर्ष प्रतिष्ठान
- साईस्थान डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड
- दानिश इन्टरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड
खासदार भावना गवळींची प्रतिक्रिया -
खासदार भावना गवळी यांना यासंदर्भात विचारले असता, किरीट सोमैया यांनी केलेल्या तक्रारीची कितीही चौकशी केली तरी यामध्ये काही आढळणार नाही. शिवसेनेच्या मागे विनाकारण ईडी लावत असल्याचे भावना गवळी यांनी बोलताना सांगितले. त्याचबरोबर कारंजाचे भाजप आमदार यांनी वाशिममध्ये 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे पुरावे दिले. मात्र, त्यावर चौकशी लागली नसून, त्यांची पण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भावना गवळी यांनी केली आहे.
किरीट सोमैया यांचे आरोप -
खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या पार्टीकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. हा 55 कोटीचा कारखाना असताना केवळ 25 लाखात विकत घेतला आहे. खासदार भावना गवळी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. यासाठी मी ईडी, सीबीआय, राज्यसरकार तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून गवळी यांच्यावर दोन आठवड्यात कारवाई सुरू करणार असल्याचे 20 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सोमैया यांनी सांगितले होते.
किरीट सोमैया यांच्यावर दगडफेक -
पार्टीकल बोर्ड कारखान्यात भेट देण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमैया हे वाशिम येथे आले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर शेतकरी व शिवसैनिकांनी दगडफेक केली. त्यांनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
भावना गवळी यांनी फेटाळले आरोप -
खासदार भावना गवळी यांनी किरीट सोमैया यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपाचे आमदार राजेंद्र पाटणी हे वाशिमचे भूमाफिया आहेत. यांनी 500 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे भाजपाच्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी मी अमित शाह यांना भेटणार असून ईडी, सीबीआयची चौकशी लावणार असून माझ्यावर झालेले आरोप खोटे असल्याचे भावना गवळी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - बॉलीवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडीकडून सलग पाच तास चौकशी