वाशिम - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात आजपासून (रविवार) 15 मेपर्यंत 7 दिवसाचा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यादरम्यान कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी राहणार आहे. तसेच दवाखाने, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद राहणार आहे. त्यामुळे पेट्रोल पंपही बंद राहणार असल्याने पेट्रोल पंपवर दुसऱ्या दिवशीही मोठी गर्दी पहायला मिळाली. तसेच वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याच दिसून आले.
पेट्रोल पंपासमोर वाहनधारकांच्या रांगा कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पिठाची गिरणी आदी दुकाने तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने, मद्य दुकानेही पूर्णपणे बंद राहणार आहे. या सर्व दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला स्वत: दुकानात जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबतचे नियोजन शहरी भागात संबंधित नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व ग्रामीण भागात संबंधित गटविकास अधिकारी यांच्या स्तरावरून होणार आहे.
हेही वाचा -लॉकडाऊनच्या धसक्याने अमरावतीत पेट्रोल पंपावर तुफान गर्दी