वाशिम - जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनाधारकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. सर्व खासगी आस्थापनाधारकांनी ११ मार्च ते २१ मार्च या कालावधीत आपली तसेच आस्थापनेत कार्यरत कामगारांची कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. कोरोना चाचणी करून घेण्यासाठी आता २५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. २५ मार्चपर्यंत चाचणी न केल्यास २६ मार्चपासून संबंधित आस्थापना बंद ठेवावी लागणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी असे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व दुकानदार, भाजीपाला, फळे, दुध विक्रेते, सलून, जनरल स्टोअर, डेअरी, कापड दुकान, मेडिकल, पीठ गिरणी, किराणा दुकानदार, हॉटेल, बार, रेस्टॉरंट, लॉज यासह इतर सर्व खासगी आस्थापनाधारक व या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची कोरोना चाचणी केली नसल्यास त्यांनी २५ मार्चपर्यंत कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे.
'या' ठिकाणी कोरोना चाचणीची सुविधा -
वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय, अनुसूचित जाती मुलींचे वसतिगृह, कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय व तुळजा भवानी मंगल कार्यालय यासह रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगरूळपी, कामरगाव व अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालये, तुळजापूर (ता. मंगरूळपीर) येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह, सवड (ता. रिसोड) येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह आणि जिल्ह्यातील सर्व २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे.
हेही वाचा - कोरोनाची दुसरी लाट १८ ते ४० वयोगटाला घातक - डॉ. अविनाश भोंडवे