वाशिम - जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या संचारबंदी आदेशामध्ये बदल करून प्रतिबंधित क्षेत्र वगळता संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी संचारबंदीचे सुधारित आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या लागू असलेली रात्रीची संचारबंदी कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. त्यामुळे रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे.
जीवनावश्य वस्तूंच्या विक्रीसाठी मुभा
या आदेशानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(२)(३) अंतर्गत जिल्ह्यात रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असून नागरिकांना हालचाल व मुक्त संचार करण्यास सक्त मनाई राहील. या काळात रुग्णालये, रुग्णवाहिका, रात्रीच्या वेळी सुरु राहणारी औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, दुध व दुग्धजन्य विक्री करणाऱ्या डेअरी, रेल्वेने तसेच एस.टी. बस व खाजगी बसने उतरणाऱ्या प्रवाशांकरिता ऑटोरिक्षा, हाय-वे वरील पेट्रोल पंप, ढाबे, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग सुरू राहतील. या उद्योगाचे कर्मचारी, कामगार यांना त्यांच्या कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे जाण्या-येण्याकरिता परवानगी राहील. तसेच सिनेमागृह, हॉटेल, उपहारगृह ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. तसेच लग्न समारंभास ५० व अंत्यविधीसाठी २० व्यक्तींना उपस्थित राहण्यास मुभा देण्यात आली आहे.
हेही वाचा- मंत्रालयाची 'बत्ती गुल'; अनेक कामे खोळंबली
सिनेमागृह, हॉटेल्स, उपहारगृहे सुरु करण्यास सशर्त परवानगी
जिलह्यात सर्व सिनेमागृह, हॉटेल्स, उपहारगृहे ५० टक्के उपस्थितीत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याठिकाणी योग्य पद्धतीने मास्क घातल्याशिवाय प्रवेश देण्यात मनाई करण्यात आली आहे. सिनेमागृहात आवश्यक तपासणी यंत्रणा ठेवण्यात येणार आहेत. तसेच सॅनिटायझरची पुरेशी व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणारी सिनेमागृहे, हॉटेल, उपहार गृहे ही कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना मालकाविरुद्ध ५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शॉपिंग मॉल मालकांनी व इतर दुकानदार यांनाही हे नियम लागू राहणार आहेत.
मास्क न वापरल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड
सार्वजनिक ठिकाणी सरकारी, निमसरकारी व खाजगी आस्थापना, कार्यालयात, प्रवासा दरम्यान नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा इत्यादीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. नाक-तोंडावर मास्क, रुमालचा वापर न केल्यास ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी व कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
गृह विलगीकरण नियमांचे उल्लंघन केल्यास कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी
जिल्ह्यात गृह विलगीकरणास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. गृह विलगीकरण मंजूर केलेल्या व्यक्तीच्या घराच्या दर्शनी भागात १४ दिवस कोविड रुग्ण असल्याबाबतचा फलक लावण्यात येईल. कोरोना बाधित रुग्णांच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारण्यात येणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित रुग्णास तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येणार आहे.
हेही वाचा- हे सत्ता प्रायोजित हप्ता कांड..! वाझे कांडावरून निरुमपांचा शिवसेनेवर निशाणा