वाशीम - तीन दिवसांच्या सुटीनंतर जिल्ह्यातील बँकांमध्ये सोमवारी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. बँकांमधील गर्दीच्या या उच्चांकाने कोरोना नीचांकी पातळीवर कसा येईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचे नियोजन कोलमडल्याने कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येते आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने तसेच पीएम किसान योजनेंतर्गतचे दोन हजार रुपये काढण्यासाठी बँकांमध्ये एकच गर्दी होत आहे.
खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार दिवस ठरवून देण्यात आले
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी बँकेत तसेच बँकांसमोर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्राशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे. तथापि, गर्दी कमी होत नसल्याचे पाहून ग्राहकांना बँकेमध्ये प्रवेश देताना त्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार दिवस ठरवून देण्यात आले आहेत.
पीएम किसान योजनेंतर्गतचे दोन हजार रुपये काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी
याउपरही गर्दी कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात २० मेपर्यंत कडक निर्बंध असून, यामध्ये बँकांना सूट देण्यात आली आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने तसेच पीएम किसान योजनेंतर्गतचे दोन हजार रुपये काढण्यासाठी बँकांमध्ये एकच गर्दी होत आहे. मागील सलग तीन दिवसांपासून बँका बंद असल्याने सोमवारी वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, मंगरूळपिर, शेलुबाजार, अनसिंग, शिरपूर, मानोरा शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर नागरिकांची एकच गर्दी झाली होती. बँकांमधील आर्थिक व्यवहार महत्त्वाचा आहेच. परंतु, बँकांमधील गर्दीतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घेणेही आवश्यक आहे.
हेही वाचा - Cyclone Tauktae LIVE Updates : चक्रीवादळ गुजरातला धडकले; जमीनीवर आल्यानंतर तीव्रता कमी..