वाशिम - गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात, या म्हणीचा प्रत्यय आला आहे, वाशिम जिल्ह्यातील खडकी या गावामध्ये, शेत धरणात गेल्याने उर्वरीत शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता, मात्र शेतकऱ्याने आपल्या शेतात जाण्यासाठी चक्का बोटीची खरेदी केली आहे. ज्ञानबा गव्हाणे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
42 हजार रुपये खर्च करून घेतली नवी बोट
वाशीम जिल्ह्यातील खडकी येथील ज्ञानबा गव्हाणे यांच्या कुटुंबाकडे 85 एकर शेती होती. मात्र त्यातील 65 एकर शेत धरणात गेल्याने आता सध्या त्यांच्याकडे 20 एकर शेत शिल्लक आहे. या शेतात जायला धरणामुळे रस्ता नव्हता. रस्ता नसल्यामुळे तब्बल 8 किलोमिटरचा फेरा मारून शेतात जावे लागत होते. त्यामुळे त्यांचा पूर्ण दिवस शेतात जाण्या-येण्यातच खर्च होत होता. तसेच शेत लांब असल्यामुळे मजुर देखील शेतात कामासाठी येत नव्हते. यावर बोट खरेदी करून ज्ञानबा गव्हाणे यांनी कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. त्यांनी 42 हजार रुपये खर्च करून बोट घेतली आहे.
बोटीमुळे शेतात जाणे सोपे झाले
2010 मध्ये खडकी येथील धरनाचे काम झाले, त्यामुळं गावातील शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली, आणी शिल्लक असलेली जमीन दुसऱ्या काठावर असल्याने, जमीन कसने कठीण झाले होते. मात्र आमच्या काकाने बोट घेतल्याने, आता शेतात जाणे सोपे झाल्याची प्रतिक्रिया गव्हाणे यांच्या पुतण्याने दिली आहे.
ज्ञानबा गव्हाणे यांची कल्पकतेच्या जोरावर समस्येवर मात
विदर्भातील सिंचन वाढावे म्हणून सरकारकडून अनेक प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली, मात्र या प्रकल्पात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. ज्या जमिनी शिल्लक आहेत, तिथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना जमिनी कसणे कठीण झाले आहे. मात्र या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानबा गव्हाणे यांनी बोट खरेदी केली आहे. त्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर रस्त्याच्या समस्येवर मात केली. त्याचा फायदा आता इतर शेतकऱ्यांना देखील होत आहे.