वाशिम - खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्याकडून खते व बियाणाचे नियोजन केले जाते. अशा स्थितीत जैविक खताच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बायो एनरिच नावाच्या बनावट जैविक खताचा लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मालेगाव पोलीस व जिल्हा परिषद कृषी विभागाने ही संयुक्त कारवाई केली. बनावट जैविक खतप्रकरणी दत्तराव गायकवाड (रा. दुधाळा) व महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे बनावट जैविक खताची तसेच विनापरवाना शेतकऱ्यांना घरपोच खत विक्री होत असल्याबद्दल माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार कृषी निरीक्षक मोहीम अधिकारी नरेंद्र रामचंद्रबारापात्रे यांच्या पथकाने मुंगळा येथून ४७ हजारांचा माल जप्त केला.
पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या तक्रारीवरून ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी सखोल तपास केला. तेव्हा शिरपूर येथे रिसोड मार्गावर असलेल्या गोडाऊनमध्ये लाखो रुपयांचा बनावट जैविक खताचा साठा असल्याची त्यांना माहिती मिळाली . कृषी विभागासह पोलिसांनी छापा टाकून गोडावूनमधून ५०० बनावट जैविक खताच्या बॅग जप्त केल्या आहेत.
शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये, म्हणून कृषी विभागाची पथके कार्यरत आहेत. तरीही बनावट जैविक खताचा साठा आढळल्याने शेतकरीवर्गाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.