वाशिम - लॉकडाऊनमुळे हातावर काम करणाऱ्या मजूरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था तर झालीय; मात्र, त्यांचा पोटाचा प्रश्न कायम होता. या मजुरांची माहिती मिळताच मदतीसाठी चेतन सेवांकुरच्या अंध कलावंतांनी मदतीचा हात पुढे केला. या मुलांनी कुंभारखेडा येथे मजुरांना धान्य व आर्थिक मदत दिली.
यानंतर कुंभारखेडा येथील पोलीस पाटील नामदेव ठाकरे यांनी त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली. मात्र, खाण्यापिण्याचा प्रश्न कायम होता. या मजुरांची माहिती चेतन सेवांकुरचे संचालक पांडुरंग उचीतकर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गहू, तांदूळ , डाळ व काही आर्थिक मदत पोहोचवली. यावेळी अंध कलावंत चेतन उचीतकरच्या हस्ते मदतीचे वितरण करण्यात आले. ऐन गरजेच्या वेळी मिळालेल्या मदतीमुळे ते मजूर कृतकृत्य झाले. या मदतीमुळे त्या मजुरांच्या काही दिवसांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था झाली असली तरी त्यांना आणखी मदतीची गरज आहे. आमच्याप्रमाणेच इतरांनीही या मजुरांना मदत करावी, असे आवाहन चेतन उचीतकर यांनी केले आहे.