वाशिम - परतीच्या पावसाने जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात 2 लाख 89 हजार सोयाबीन क्षेत्र असून देखील प्रशासनाने केवळ 6 हजार 553 हेक्टरवर नुकसान झाल्याचा अहवाल तयार केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर शेतकरी मदत आणि पीकविम्यापासून वंचित राहणार आहेत. त्यासाठी भाजपा आक्रमक झाली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत मिळावी, यासाठी भाजपा युवा मोर्चा आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्त्वात कारंजा तहसील कर्यालयावर हुंकार आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
परतीच्या पावसाने पश्चिम विदर्भातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बोंडे यांनी केला. त्यामुळे आम्ही राज्यातील पहिले हुंकार आंदोलन कारंजा येथे केले, असे बोंडे म्हणाले. सरकारने जर सरसकट शेतकऱ्यांना मदत दिली नाही, तर यापुढे एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.