वाशिम - जिल्ह्यात भारिप-बहुजन महासंघाला उभारी देण्यात मोलाचा वाटा असलेले पक्षाचे प्रदेश महासचिव तथा जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजाणी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या चर्चा सुरू होत्या. त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे आता जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
भारिप- बहुजन महासंघाची जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर पुंजाणी यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची विक्रमी मते मिळविली. शिवाय त्यानंतर पार पडलेल्या नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कारंजा व मंगरूळपीर नगर पालिकेत एकहाती सत्ता मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. याशिवाय ग्रामपंचायत निवडणुकीत देखील पक्षाचे सदस्य निवडून आणण्यासाठी त्यांनी उमेदवारांना सहकार्य केले.
दरम्यानच्या काळात भारिप- बहुजन महासंघामध्ये अंतर्गत गटबाजीने उचल घेतली. या गटबाजीला कंटाळलेले पुंजाणी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा जिल्ह्यात दाखल होणार असल्याच्या पार्श्वभुमीवर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे बोलोले जात आहे.