वाशिम - सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी जिल्ह्यात अष्टसूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याविषयीची माहिती अभिनेता आमिर खान यांना मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार यांना आपल्या निवासस्थानी बोलावून यासंदर्भात माहिती घेतली. जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ४५० हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोयाबीन पिकाखाली जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्र आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे. ही तूट भरून काढण्यासाठी कृषी विभागाने उपाय योजले आहेत. सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी अष्टसूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
नेमकी अष्टसूत्री काय आहे...
या अंतर्गत बियाण्यांची प्रतवारी करून उगवण क्षमता ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास हेक्टरी ६५ ते ७५ किलो पेरणीसाठी वापरावे. घरगुती बियाण्यांतून १०० दाण्यांच्या माध्यमातून बियाणे उगवण क्षमता तपासून घ्यावी. हे करीत असताना बियाण्यांवर रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी दहा वर्षांच्या आतील वाणाची निवड करून बियाणे पेरणीसाठी तयार करावे. सलग दोन - तीन दिवस ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणीचे काम हाती घ्यावे. पेरणी करताना बियाणे तीन ते पाच सेंटीमीटर खोलीवर पडत असल्याची खात्री करून घ्यावी. सोयाबीनला रासायनिक खत देत असताना कृषी विभागाचा सल्ला घ्यावा. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने तणनाशकाचा वापर करावा आदी बाबींचा या अष्टसूत्रीत समावेश करण्यात आला आहे.
पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात तोटावार यांना निमंत्रण -
राज्याच्या कृषी विभागाच्या सचिवांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. यानंतर आता अभिनेता आमिर खान यांनी जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार यांना आपल्या निवासस्थानी बोलावून यासंदर्भात माहिती घेतली आहे. दर रविवारी होणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सोयाबीन डिजिटल शेती शाळामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तोटावार यांना निमंत्रण दिले आहे.