वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी १ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. सद्यस्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत असल्याने जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १ जून रोजीच्या सकाळी ७ वाजेपासून ते ७ जून रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. याबाबतचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आज, ३१ मे रोजी नवीन आदेश लागू केले आहेत.
सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
या आदेशानुसार जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. मात्र, शनिवारी व रविवारी केवळ किराणा दुकान, फळे, भाजीपाला विक्रेते, दुध डेअरी, पिठाची गिरणी, मांस, अंडी, मासे विक्रीची दुकाने व रेशन दुकाने ही अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. दुध डेअरी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. तसेच घरपोच दुध वितरणास सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहील. जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, कृषि उत्पन्न बाजार समिती दैनंदिन सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. आपले सरकार सेवा केंद्र, आधार केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर, बँक व्यवसाय प्रतिनिधी, बँक ग्राहक सेवा केंद्र सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील.
ऑनलाईन औषध सेवा २४ तास सुरु
भाजीपाला दुकाने व फळविक्रेते यांच्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी विकेंद्रित स्वरुपात ठिकाणे निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. परवानगी दिलेल्या सर्व दुकानांमध्ये एकाच वेळी ५ पेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश देवू नये. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी यापूर्वी पारित केलेल्या सर्व अटी व शर्तींचे, कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, गुरांचे दवाखाने, ऑनलाईन औषध सेवा २४ तास सुरु राहतील.
हॉटेल, रेस्टॉरंट, चॅट कॉर्नर, बारमधून पार्सल सुविधेला मुभा
हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ अथवा शिवभोजन थाळी केंद्रामध्ये थेट प्रवेश असणार नाही. चॅट कॉर्नरच्या दुकानातून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत पार्सल सुविधा सुरु राहील. मात्र, सदर दुकानाच्या ठिकाणी थांबून ग्राहकांना पदार्थ खाण्याची मुभा राहणार नाही. सर्व बार, दारू दुकानातून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत पार्सल सुविधा सुरु राहील.
हेही वाचा - राज्य सरकारने कोरोनाच्या नव्हे तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे लॉकडाऊन वाढवले - नितेश राणे