वाशिम - राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे. मात्र, जिल्ह्यातील ४० शेतकऱ्यांची ओलिताची जमीन असून त्यांना कोरडवाहू शेतीचा मोबदला देत असल्याने शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दिला. त्यामुळे आज (गुरुवारी) जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात उभ्या पिकात बुलडोझर फिरविला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपले कपडे काढून अधिकाऱ्यांना दिले आणि या घटनेचा निषेध केला.
समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यात ५२ गावातील २ हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन जात आहे. यापैकी बहुतांश शेतीचे भूसंपादन झाले आहे. मात्र, मालेगाव तालुक्यातील वारंगी, रिधोरा, सुकांडा अनसिंग आणि सुदी येथील ४० शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे आज जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जमीन संपादित करुन शेतातील उभे पीक नष्ट केले आहे.
वारंगी येथील शेतकरी विजय दहात्रे यांची १३ एकर जमीन समृद्धी महामार्गात जात आहे. ही जमीन ओलिताची असून त्यांना कोरडवाहू शेतीचा मोबदला देत असल्याने त्यांनी जमीन देण्यास नकार देत जमिनीवर पेरणी केली. पण, आज बुलडोझर फिरविल्यामुळे शेतातील पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला पिकासहित मोबदला द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.