वाशिम - पश्चिम विदर्भात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. वाशिम जिल्ह्यात दरदिवशी 300 पेक्षा जास्त कोरोना रूग्ण वाढत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम म्हणून ऑक्सिजनची गरज वाढत आहे. अकोल्यातून वाशिमला होणारा ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने वाशिममध्ये ऑक्सिजनचा कृत्रिम तुटवडा झाल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, जिल्हाधिकऱ्यांनी जालन्यातून ऑक्सिजनचा पुरवठा मिळवला आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नसल्याचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी स्पष्ट केले.
ऑक्सिजनचा तुटवडा नाही -
वाशिमसाठी अकोला येथून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा 28 मार्चपर्यंत नियमित सुरू होता. मात्र, अकोल्यात कोविड रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने तेथील रुग्णांसाठी कृत्रिम ऑक्सिजन गरज भासत आहे. त्यामुळे वाशिमचा ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला जात असल्याचे अकोला येथील अन्न व औषध प्रशासनाने वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवले होते. त्यानंतर वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जालन्याकडून ऑक्सिजन पुरवठा मिळवला आहे.
वाशिम जिल्ह्यातील कोरोना सोबतच दुसऱ्याही रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनचे 300 जम्बो सिलेंडर सामान्य रुग्णालयात उपलब्ध आहेत. यातील 200 सिलेंडर हे ऑक्सिजनने भरलेले असल्याची माहिती डॉ. राठोड यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याच्या बातम्यांचे देखील त्यांनी खंडण केले आहे.
हेही वाचा - वाशिममध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा