वाशिम - राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र दिसून येत आहे. या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम कडक करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात आता नागरिक ‘विना मास्क’ आढळून आल्यास पालिकेसोबतच पोलीसही कठोर कारवाई करणार आहेत.
पोलिसांच्या व वाहतूक पोलिसांच्या सहकाऱ्याने वाशिम नगरपालिका संयुक्त कारवाई करणार येत आहे. आज पहाटेपासूनच कारवाईसाठी वाशिमचे मुख्याधिकारी स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. पुढील काळात गरज पडल्यास दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याच्या सुचनाही नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी दिल्या आहेत.
५०० ते २००० रुपयांपर्यंत दंडाची आकारणी-
वाशिम जिल्ह्यातील गेल्या दीड दोन महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. मात्र, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे आणि लसीकरणाला सुरुवात झाल्यामुळे नागरिक निर्धास्तपणे फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणी तसेच रस्त्यांवर तोंडाला विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. मास्क ना लावणाऱ्यांकडून 500 रुपये, तर गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावणाऱ्यांमध्ये 2000 रुपये पर्यंतचा दंड आकारण्यात येत आहे.