वाशिम - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या १४ जागा रिक्त झाल्या असून सदर जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. या जागांपैकी ५० टक्के म्हणजेच ७ जागांवर महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आज, २३ मार्च रोजी नियोजन भवन येथे आरक्षण सोडत झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा जिल्हा परिषद निवडणूक नोडल अधिकारी सुनील विंचनकर, तहसीलदार शीतल वाणी-सोलट यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सोडत
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कारंजा तालुक्यातील भामदेवी, मानोरा तालुक्यातील कुपटा, तळप, फुलउमरी, मंगरूळपीर तालुक्यातील दाभा, कंझरा, आसेगाव, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, रिसोड तालुक्यातील कवठा खु., गोभणी, भरजहांगीर, वाशिम तालुक्यातील काटा, पार्डी टकमोर, उकळीपेन या १४ जागा रिक्त झाल्या. आज झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये यापैकी कारंजा तालुक्यातील भामदेवी, मानोरा तालुक्यातील तळप, फुलउमरी, मंगरूळपीर तालुक्यातील कंझरा, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, रिसोड तालुक्यातील गोभणी व वाशिम तालुक्यातील काटा हे सात जिल्हा परिषद निवडणूक विभाग सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे.