वाशिम- रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 7 व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये कारंजा लाड येथील 38 व 48 वर्षीय महिला, 33 व 58 वर्षीय पुरुष व दोन 6 वर्षीय मुली, हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील 29 वर्षीय युवक, असे एकूण 7 व्यक्तींचा समावेश आहे.
हिवरा रोहिला येथील युवक सोडून इतर सर्वजण हे कारंजा लाड येथील गांधी चौक येथील कोरोना बाधितांच्या नजीकच्या संपर्कातील आहेत. हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील 29 वर्षीय कोरोनाबाधित युवक विरार, मुंबई येथून आला असून तो तेथे कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आला होता. तसेच कोरोना संसर्गाची लक्षणे असल्याने त्याच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. यात तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या 59 वर गेली असून दोघांचा मृत्यू, तर 49 रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान आज आढळलेल्या 7 कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध जिल्हा प्रशासन घेत आहे.