वाशिम - कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करावे, असे वारंवार सांगूनही अनेक नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. या नागरिकांवर कारवाई करत वाशिम पोलिसांनी 15 फेब्रुवारी पासून आतापर्यंत 1 कोटी 53 लाख 80 हजाराचा दंड ठोठावला आहे.
पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तसेच चेक पोस्ट उभारणी करून कोरोना चाचणी व विनाकारण फिरणाऱ्या, विनामास्क, ट्रिपल सीट वाल्याची कसून तपासणी करीत पोलीस कारवाई केल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले आहे. जिल्ह्यात 15 फेब्रुवारी ते आजपर्यंत पोलिसांनी कडक कारवाई करत विनामास्क फिरणाऱ्या 26 हजार 505 जणांवर कारवाई केली असून 21 लाख 58 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर ट्रिपल सीट जाणाऱ्या 9 हजार 818 जणांवर कारवाई करून 2 लाख 5 हजार रुपये दंड वसूल केला, तसेच कलम 188 चे उल्लंघन केल्याचे 2244 गुन्हे दाखल करण्यात आले असून जिल्ह्यात 15 फेब्रुवारी ते आतापर्यंत विविध कारवाई करीत 1 कोटी 53 लाख 80 हजारांचा दंड वसूल करण्यात आला, असे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर आणि हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने वारंवार केले. परंतू, याकडे अनेकजण दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आल्याने पोलीस विभागाने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.