वर्धा - जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून पारा 46.4 अंशावर पोहोचला आहे. समुद्रपूर तालुक्यात उन्हाचा येदलाबाद येथे 75 वर्षीय महिलेचा शेत शिवारात उन्हाचा तडाखा बसल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. प्राथमिक अंदाज उष्माघात असला तरी शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. सत्याकांता रामाजी लोहकरे, असे मृत महिलेच नाव आहे.
सत्यकांता आपल्या शेतात सरपन गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. उन्हाचा तडाखा बसल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान पाणी पिण्यासाठी दिलीप नौकरकर यांच्या शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेल्या. शेतातील गोठ्याजवळ सावली शोधत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
माहिती मिळताच गावात हळहळ व्यक्त होत आहे. गिरड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच उष्मघात असल्याचे दिसून येत असल्याचेसुद्धा सांगितले जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालातून कारण स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.
शेत शिवारात काम करताना काळजी घेण्याची गरज -
उन्हाचा पार दिवसेंदिवस चढत आहे. अशातच शेत शिवारात काम करताना पाणी सोबत ठेवण्यास सांगितले जात आहे. बरेचदा कोरडवाहू शिवार असल्याने दूर दूर पर्यंत पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे उन्हातील कामे टाळावी. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करूनच शेतात जावे, असे वैदकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.