वर्धा- समुद्रपुर तालुक्यातील जाम येथे नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या महिलेचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. आजारपणाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रविवारी रात्री गळफास घेत तिने आयुष्य संपवले. श्वेता प्रशांत ढेपे (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे.
हिंगणघाट जाम येथील प्रशांत केशव ढेपे यांच्याशी मार्च २०१९ रोजी श्वेता पाटील (वय ३३) यांचा विवाह झाला होता. इंद्रायणीनगर दत्तवाडी येथे दोघांचाही पुनर्विवाह झाला होता. नवीन संसार उभा होताच श्वेताला पोटाचा विकार सुरू झाला होता. दरम्यान, काही दिवसांपासून त्यांनी आजारपणावर उपचारही घेतले होते.
आयुष्यातील एकटेपणा जाऊन पुन्हा नव्याने संसार उभा रहावा म्हणून कुटुंबीयांनी पुनर्विवाह करून दिला होता. परंतु, आजारपणाला कंटाळून मध्यरात्री घरात सर्व गाढ झोपेत असताना तिने गळफास घेतल्याचा संशय आहे. सकाळी सर्व झोपेतून उठल्यावर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यानी घटनास्थळाला भेट दिली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.