वर्धा - महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या वतीने लॉकडाऊन काळात ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनारच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र घेतले जात आहे. यात बुधवारी 'सिनेमा शिक्षण रोजगार आणि आव्हाने' या विषयावर चर्चा करण्यात आली. यामुळे सिनेमाच्या माध्यमातून समाज परिवर्तन सुद्धा झाले आहे. यामुळे विद्यापीठात येत्या काळात सिनेमा क्षेत्रावर आधारित अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल म्हणाले.
राष्ट्रीय स्तरावर वेबिनारचे आयोजन करत वेग वेगळ्या विषयावर चर्चा करण्यात येत आहे. यात विश्वविद्यालयातील प्रदर्शनकारी कला विभागात विद्यार्थ्यांना चित्रपटाशी संबंधित अभिनय, उत्पादन आणि वितरण विषयाचे शिक्षण देणारे एक केंद्र स्थापन करण्याचा विचार सुरू आहे. यामध्यमातून सिनेमा उद्योग आणि दूरचित्रवाणीकरिता आवश्यक मानव संसाधन आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पाऊले उचलली जात आहे. भारतीय भाषांच्या प्रसारात हिंदी सिनेमाचे महत्वाचे योगदान आहे. यात केवळ मनोरंजनच नव्हे तर सामाजिक परिवर्तन घडविण्यातही महत्वाची भूमिका बजावली आहे.
डिजिटल मार्केटिंगमध्ये मोठी संधी
सुदीप्तो आचार्य यांनी सिनेमा शिक्षण विद्यार्थी केंद्रित असले पाहिजे असे सांगून प्रदर्शनकारी कलेत तंत्रज्ञानविषयक शिक्षण असणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले. डॉ. कुलवीन त्रेहन यांनी समाज माध्यमांवर जाहिरात आणि संहिता लेखनात रोजगाराच्या संधी असून वेब मार्केटिंग कम्युनिकेशन आणि यासारख्या इतर प्लॅटफॉर्मवर प्रशिक्षित युवकांची मोठी मागणी असल्याचेही सांगितले.
वेब सिरीजचे चलन वाढतीवर
डिजिटल क्रांतीमुळे आज मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग वेब सिरीजकडे चालला आहे. कोरोनाचा काळात चित्रपट प्रदर्शन आणि मालिका निर्मितीचे काम बंद राहिले. व्हिडिओ आणि ओवर द टॉप या क्षेत्रात नव्या रोजगार संधी आहेत. रेडियोची लोकप्रियता वाढल्याने या माध्यमातही चांगला वाव असल्याचे वरिष्ठ पत्रकार सिने समिक्षक अनंत विजय यांनी सांगितले. यासह क्लाउड तंत्रज्ञान, डाटाबेस व नेटवर्किंग क्षेत्रात अलिकडे रोजगार वाढले आहे.
मीडिया योद्धा तयार करा- वरिष्ठ पत्रकार जगदीश उपासने
आजच्या काळात शिक्षण संस्थांनी बदलते तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे. त्यानुसार माध्यमांना ठोस, स्पष्ट आणि विश्वसनीय संदेश तयार करणारे युवक हवे आहेत, तसे योद्धा विद्यापीठांनी तयार करावे असे वरिष्ठ पत्रकार जगदीश उपासने म्हणाले.
चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी भारतीय ज्ञान, संस्कृति, कला, साहित्य, योग, आयुर्वेद या विषयांवर सिनेमा शिक्षण देण्याची गरज व्यक्त केली, तसेच यावर दर्जेदार चित्रपट करून भारतीय संस्कृती आणि सभ्यता सिनेमातून जगापुढे आली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारमध्ये सहाय्यक अध्यापक डॉ. सतीश पावडे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी कुलगुरुद्वय प्रो. हनुमान प्रसाद शुक्ल, प्रो. चंद्रकांत रागीट यांच्यासह अध्यापक, सिनेप्रेमी, संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते.
याप्रसंगी माखनलाल चतुर्वेदी जनसंचार विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू जगदीश उपासने, प्रख्यात फिल्मकार विवेक अग्निहोत्री, जम्मू विश्वविद्यालयाचे प्रो. परीक्षित सिंह मिन्हाज, विसलिंग वुड्स इंटरनॅशनल मुंबईचे प्रो. सुदीप्तो आचार्य, गुरू गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विश्वविद्यालय नवी दिल्लीच्या डॉ. कुलवीन त्रेहन यांनी सिनेमा शिक्षण, रोजगार, सिनेमा-पर्यटन, मीडियामध्ये दृश्य-श्रव्य माध्यम, सिनेमा शिक्षण रोजगार आणि आव्हाने इत्यादी विषयांवर चर्चा करत मार्गदर्शन केले.