वर्धा - सध्या तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. अश्यातच यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने गावात पिण्याच्या पाण्याची झळ पोहचायला लागली आहे. याचा फटका आता वन्यप्राण्यांना बसताना दिसत आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येत आहेत. समुद्रपूर तालुक्यात रविवारी सकाळी एक अस्वल शेतात आल्याने एकच खळबळ उडाली.
समुद्रपूर तालुक्याच्या शिवनफळ भागातील किसना शिंदे यांचे शेत आहे. आज सकाळी मजूर काम करत असताना हे अस्वल मजुरांना दिसले आणि खळबळ उडाली. ही बातमी गावात पसरली आणि लोकांनी गर्दी केली. वन विभागाला माहिती मिळाली. वन विभागाचे कर्मचारीही पोहचले. अखेर अस्वलाला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावण्याचे काम सुरू झाले. सध्या पोथरा प्रकल्पाच्या भागात हे अस्वल पोहचल्याचे सांगितले जात आहे.
फटाके फोडून पाठलाग करत मोठ-मोठ्याने आवाज करत अस्वलाला पिटाळून लावण्याचे प्रयत्न करण्यात आले. लोकांच्या मदतीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज अस्वलाला जंगलात पळवण्यात यश मिळवले. पण परिसरात मात्र, मजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे अस्वल मागील काही दिवसांपासून फरिदपूर भागात आढळून आली होती. या भागात धरण असल्याने तेथे गेली असावीत. पाण्यामुळे आणि शेत शिवार रिकामे झाल्याने पाणी किंवा थंडावा मिळत नाही आहे. यामुळे वाढते तापमान पाहता पाण्याचा शोधात गावाकडे वन्यप्राणी येऊन पोहचत आहेत. यामुळे जंगलातच पाण्याची व्यवस्था न केल्यास वन्यप्राणी गावाकडे धाव घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.