वर्धा - सोमवारी (दि. 3 फेब्रुवारी) हिंगणघाट येथे झालेल्या जळीत कांडासंदर्भात आरोपीला ताब्यात घेतले असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. जलदगतीने या घटनेचा तपास करून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल. तसेच खटला सुरू करण्यात येईल, अशी माहिती वर्ध्याचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.
पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सोमवारी घटना घडल्यानंतर आरोपी हा नागपूरच्या दिशेने पळून जात होता. त्यावेळी त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. अटक केल्यानंतर त्याला मंगळवारी (दि. 4 फेब्रुवारी) न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यात पुढील तपास सुरू आहे. सुरुवातीला हिंगणघाट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार हे तपास करत होते. पण, गुन्ह्याचे गांभीर्य पाहता तसेच महिलासंदर्भात हा गुन्हा असल्याने या गुन्ह्याचे तपास पुलगावचे पोलीस उपाधीक्षक तृप्ती जाधव यांच्याकडे याचा तपास वर्ग करण्यात आला आहे.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : देवा 'तिला' वाचव, वर्ध्यात विद्यार्थ्यांची प्रार्थना
पुरावे, जबाब गोळा करण्याचे काम सुरू असून तृप्ती जाधव यांच्या पथकात उत्तम अधिकारी नेमण्यात आले असून गुन्ह्याचा सखोल तपास लवकरात लवकर होईल, असा विश्वास अधीक्षक तेली यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर इतर कोणाकडे या घटनेसंदर्भात कोणताही पुरावा असल्यास तो पोलिसांकडे सादर करावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'त्याने' तिला जाळण्याची आधीच केली होती तयारी; सोबत बॉटल, टेंभा, कपडे अन् बरंच काही...
पोलीस महानिरीक्षकांनी दिली भेट
पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न यांनी हिंगणघाट येथे जाऊन घटनास्थळी भेट दिली. प्रकरणाची माहिती जाणून घेतली. लवकरात लवकर आरोपीला अटक केल्याने पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले. यात महत्वाच्या बारीक सारीक बाबींकडे लक्ष देऊन तपास केला जात आहे, असे पोलीस महानिरीक्षक म्हणाले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.
हेही वाचा - 'देशात टीव्ही सोडला तर बाकी सर्व महाग'