Wardha Sevagram Ashram : देशप्रेम जागृत करणारे प्रेरणास्थान वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम - Indian National Congress
वर्ध्यातील 'सेवाग्राम' आश्रम ( Wardha Sevagram Ashram ) हे महात्मा गांधीजी यांची कर्मभूमी असे ओळखले जाते. स्वातंत्र्य लढ्याची राजधानी आणि इतिहासाचे साक्षीदार हे आश्रम ( Sevgram Ashram Witness Of History ) आहे. देशप्रेम आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्याची साक्ष आणि प्रेरणास्थान आहे ही भूमी.

वर्धा - महात्मा गांधीजींची कर्मभूमी अशी ओळख असलेले पवित्र स्थळ म्हणजेच वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम ( Wardha Sevagram Ashram ) आहे. स्वातंत्र्य लढ्याची राजधानी आणि इतिहासाचे साक्षीदार हे आश्रम आहे. देशप्रेम आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्याची साक्ष आणि प्रेरणास्थान आहे ही ( Sevgram Ashram Witness Of History ) भूमी. त्यामुळेच आजही गांधीजी आणि स्वातंत्र्य लढ्यातील महत्व सांगणारे आणि सत्य अहिंसा आणि शांतीचा मार्ग दाखवणारे भूमीचे काय महत्व आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत.
महात्मा गांधी हे 1933-34 मध्ये वर्धा म्हणजेच तत्कालीन पालकवाडीला आल्याची नोंद आहे. गांधीजींचे मानसपुत्र जमनालाला बजाज यांच्या ( Mahatma Gandhi Son Jamnalal Bajaj ) आग्रहामुळे गांधीजी वर्ध्यात आले. ते 1935 मध्ये मगनवाडी आजचे एमगिरी केंद्र येथे एका खोलीत राहिले. त्यानंतर सेवाग्राम रोडवरील पहिले सत्याग्रही आश्रम म्हणजेच आजचे महिलाश्रमात राहिले. त्यांनी मिस लेड म्हणजेच मिराबेन यांना शहरापासून दूर आणि शांत जागा शोधण्याची जबाबदारी सोपवली. पुढे तत्कालीन शेगाव म्हणजे आजचे सेवाग्राम येथे आश्रम स्थापन झाले. त्यांच्यासाठी आश्रमात आदी निवास बांधण्यात आले. हे आदीनिवास कुटी अत्यंत महत्वाची आणि भारत छोडो आंदोलनासह अनेक बैठकांची साक्षीदार असलेली कुटी आहे. पण वर्ध्यात येण्याच्या निर्णय गांधीजींना का घेतला यामागे सुद्धा स्वातंत्र्य लढ्याच्या राजधानीचे खास वैशिष्ट्य आहे.
देशाचा केंद्रबिंदू म्हणून मध्यभागी आश्रमासाठी निवड
साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला निघाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत साबरमतीला परतणार नाही, असा निर्णय महात्मा गांधींनी घेतला होता. दांडी यात्रेदरम्यान इंग्रजांनी गांधीजींना दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. गांधीजी जेव्हा बाहेर आले तेव्हा देशाच्या मध्यभागी असलेल्या एखाद्या गावाला स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीचे केंद्र बनवावे, असे ठरले. यानंतर गांधीजींना राहण्यासाठी जागेसाठी विचारमंथन सुरू झाले. त्यावेळी जमनालाल बजाज यांनी वर्ध्यातील जागा सुचवली. ही जागा देशाच्या मध्यभागी होतीच शिवाय रेल्वेच्या साह्याने देशाच्या कुठल्याही भागात जाणे सोपस्कर होते.
पत्र व्यवहार आणि लेखन कार्य केले बापूंनी
गांधीजींचे वास्तव्य सेवाग्राम आश्रमात झाल्यानंतर काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठका या सेवाग्राम आश्रमात होत होत्या. यासोबतच सेवाग्राम आश्रमातून होणारा पत्रव्यवहार, लेख हे स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे दस्तावेज या ठिकाणावरून गांधीजींनी लिहिलेले आहे. माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक सुद्धा त्यांनी येथे वास्तव्यास असताना लिहले आहे. तसेच देशभरातील मान्यवर मंडळींना किंवा महत्वाचे पत्र लिहिण्याचे काम त्याचे महादेव भाई देसाई यांनी बापूंच्या दप्तर येथुन करत.
पहिले व्यक्तिलक सत्याग्रहीची घोषणा आणि ओळख
नेताजी सुभाषचंद्र बोस ( Netaji Subhas Chandra Bose ) 1939 मध्ये भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ( Indian National Congress ) झाले. त्यामुळे त्यांच्याशी होणारा संवाद तसेच महत्त्वाच्या भेटीगाठी या सेवाग्राम आश्रमात होत राहिल्यात. द्वितीय महायुद्धात भारताने सहभागी होऊ नये हा महत्वपूर्ण निर्णयाचा पत्रव्यवहार नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी आश्रमातून झाला. तसेच 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह सुरू करण्यासाठी पवनार आश्रमातून विनोबाजींना सेवाग्रामला बोलावून घेतले. त्यांनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून याच आश्रमातून घोषणा केली. यानंतर विनोबाजींवर लेख लिहून त्यांनी विनोबांची ओळख संपूर्ण जगाला आणि वैयक्तिक सत्याग्रही या लेखांच्या माध्यमातून त्याच्या कार्याची ओळख पटवून दिली.
भारत छोडोचा नारा देणारी बैठक आणि प्रस्तावाला मंजुरी
ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्यास नाकारल्यानंतर सविनय कायदेभंग आंदोलन देशभरात सुरू करण्यात आले. तसेच भारत छोडोचा ऑगस्ट क्रांती आंदोलनाचा पाया आणि महत्वाची बैठक 14 जुलै 1942 मध्ये सेवाग्राम आश्रमात पार पडली. याच बैठकीत आंदोलनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर 8 ऑगस्टला मुंबई येथून आंदोलन सुरू करण्यात आले. देशभर हे आंदोलन पेटून उठले आणि इंग्रजांना भारत छोडो या नाऱ्याने देशातच नाही तर इंग्लडमध्ये ब्रिटिश राजवटीला मोठा हादरा बसला. या आंदोलनाचे परिणाम म्हणजे भारतीयांच्या मनात इंग्रजां प्रति असलेली भीती निघून गेली.
देश प्रेमाचे प्रेरणास्त्रोत
सेवाग्राम आश्रम हे केवळ स्वातंत्र्य लढ्यातील केंद्रबिंदू किंवा स्वातंत्र्यलढ्याची राजधानीचे स्थळ होते असे नाही. जे स्थान आणि महत्त्व स्वातंत्र्यलढ्यात राहिले तेवढेच महत्व या भूमीला महात्मा गांधींच्या पावन स्पर्श लाभल्याने अजरामर झाले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देश मुक्त होण्याच्या महत्वाच्या कालखंडात साक्षीदार राहिलेले हे आश्रम आजही संपूर्ण देशासाठी प्रेरणास्रोतच आहे. त्यामुळे या पावन भूमीत येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची भावना आपसुकच अधिक तीव्र होते हेच खरे.
हेही वाचा - स्वातंत्र्यलढा ते स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांचा साक्षीदार येरवडा कारागृह