हिंगणघाट (वर्धा) - विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खरिप हंगामातील दिवाळीचा बोनस म्हणजेच सोयाबीन तर पांढरे सोने म्हणजे कपाशीचे पीक अशी ओळख आहे. मात्र यंदा सोयाबीनचे पीक हे नैसर्गिक संकटामुळे मातीमोल झाले. तर कपाशीचेही बोंड अळीने नुकसान केले आहे. हे कपाशीचे पीक बोंड अळीमुळे जमीनदोस्त करण्याची वेळ आली आहे.
160 क्विंटल कापूस मातीमोल
हिंगणघाटच्या पोहण्यातील शेतकरी विजय राऊत यांनी 12 एकरात कपाशी पिकाची लागवड केली. जवळपास 6 फूट कपाशीच्या झाडाची वाढ झाली. मात्र बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला. शेतकऱ्याचे जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले. कपाशीचे पिक चक्क ट्रॅक्टर फिरवत जमीनदोस्त करावे लागले. यंदा 12 एकरात जवळपास दोनशे क्विंटल कापूस होईल अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती. मात्र जेमतेम 23 क्विंटल कापसाचे उत्पादन हाती आले आहे.
जिल्हाधिकारी भीमनवार यांची पाहणी
हिंगणघाटचे आमदार समीर कुणावर यांनी शेताची पाहणी केली आहे. तसेच जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्यासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासनापुढे मांडले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेत बुधवारी समुद्रपूर तालुक्याचा दौरा केला. नुकसान पाहता कृषी विभागाला पंचनामे करत अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.