वर्धा - कोरोनाविरुद्ध लढा देताना मागील काही महिन्यांपासून प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, आता इतर जिल्हा, राज्यात अडकलेल्या लोकांच्या येण्यामुळे आपल्या जिल्ह्यात कोरोनाची बाधा होऊ नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे, मागील दोन महिन्यांपासून राबवत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक सजगपणे राबविल्यास पुढील कठीण परिस्थिती टाळता येईल. या काळात सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आपत्ती व्यवस्थापनात काम करणा-या प्रमुख विभागांना व अधिका-यांना दिल्या.
बाहेर जिल्हा किंवा राज्यातून येणा-या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. सुमारे ४ हजार लोक गेल्या ४ दिवसात जिल्हयात दाखल झाले आहेत. तसेच यापुढेही येत राहतील. या सर्व लोकांचे संपूर्ण कुटुंब गृह विलगीकरण करावे. त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवावे. त्यांच्या गृह विलगीकरणाच्या कालावधीत त्यांना घरपोच जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात यावा. बाहेरून येणा-या व्यक्तींची माहिती मिळाल्यावर तात्काळ त्यांना क्वारंटाईन केल्यास पुढचा धोका टाळणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य विभागाने तयार केलेल्या १ हजार १५० आरोग्य पथकांमार्फत तापासणी करताना ताप, सर्दी , खोकला याची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना वेगळे करून त्यांच्यावर लगेच उपचार करावेत. या पथकाकडून तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांनी माहिती घेवून त्याचे विश्लेषण करावे आणि रोज अहवाल द्यावा. ग्रामीण भागात आरोग्य पथक जात असले तरी शहरी भागात हे पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे, शहरी भागातील पथकाने हे काम जास्त जबाबदारीने करणे आवश्यक आहे. कारण शहरी भागात बाहेर जिल्हयातून येणा-यांची संख्या वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.
भीमनवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून आठही तालुक्यातील अधिका-यांची व्हिडिओ कॉन्फरंसिंद्वारे बैठक घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण महिरे उपस्थित होते.