वर्धा - लाल दिवा येत-जात राहतो, मंत्रीपद आमदारकी खासदारकी हे आज आहे उद्या नाही, पण या लाल दिव्यापेक्षा लाल रक्ताच्या माणसांसाठी काम केले पाहिजे. विदर्भातील जनतेने काम करण्याची संधी दिली, यामुळे काम करू शकलो असल्याचे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ते वर्ध्याच्या बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले, लाल रंग काही नवीन नाही. 1999 मध्ये पक्षाने मंत्री केले, लाल दिव्याच्या गाडीत फिरलो, मंत्री नव्हतो लाल रंगाच्या बसमध्येही फिरलो.
महाराष्ट्रात दरवर्षी नवीन बसेस देऊ, वर्ध्यासाठी 50 बसेस जाहीर-
वर्ध्यात बसस्थानक झाले, मात्र भंगार बसेस असल्याने नवीन बसेसची मागणी खासदार रामदास तडस यांनी केली. यावर अर्थमंत्री यांनी नवीन कोऱ्या 50 बस देण्याची घोषणा केली. राज्यात एकूण 18 हजार बसेस आहेत, महाराष्ट्रातील प्रत्येक बसस्थानकाला दरवर्षी टप्प्याटप्याने नवीन बसेस देण्यात अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या जनतेचा हक्क आहे. त्यांनीही नव्या कोऱ्या बसमधून फिरावे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
चांगले काम करताना अनेकांना पोट दुःखी होते. एका कामात चूक झाली की लोक काय-काय कमेंट करतात हे पाहून व्हॅाटसअॅप निर्माण करणाऱ्याने सातव्या मजल्यावरून उडी मारली असेल, असे म्हणत व्हॅाटसअॅपचा उपयोग समाजाला दिशा देण्यासाठी आहे की दशा करण्यासाठी याचा विचार झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते मिश्किलीने म्हणाले.
यावेळी त्यांनी बस स्थानकाचे लोकार्पण करत परिसराची पाहणीही केली. यावेळी विद्यार्थी जीवनात याच बसस्थामकातून अनेकवेळा प्रवास केल्याचे त्यांनी बोलून दाखवले. पालकमंत्री नसलो तरी वर्धेकरांशी नाते जुडले आहे. आमदार पंकज भोयर यांना तिजोरीची कोड देऊन ठेवतो, विकास कामाला निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही देत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंचावर खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, रामदास आंबटकर, अनिल सोले, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी खासदर विजयराव मुळे, सुरेश वाघमारे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.