वर्धा - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, अनलॉकनंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सध्या अनलॉकचा पाचवा टप्पा सुरू आहे. या सगळ्यात सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही कलाकारांना कार्यक्रम घेण्यास परवानगी मिळाली नाही. मात्र, ज्यांचे पोट कलेवर आहे, त्यांच्यासमोर जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यक्रमांना, संगीत शाळांना परवानगी देण्याची मागणी संगीत कलोपासक संघाने केली आहे. अन्यथा आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशा शब्दांत कलाकारांची व्यथा मांडण्यात आली आहे. यासंंबंधित येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषद घेण्यात आली.
संचारबंदी सुरू होताच सामाजिक सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम उपक्रमांद्वारे लोकांची गर्दी होऊ नये बंद करण्यात आले. मात्र, त्यामुळे कलाकारांना आर्थिक अडचणीना समोर जावे लागत आहे. कार्यक्रमांच्या माध्यमातून अर्थार्जन होत आहे. दुसरे माध्यम नसल्याने संसाराचा गाढा कसा ओढावा? हा प्रश्न आहे. कौटुंबिक अडचणींबरोबर मुलांच्या शिक्षणाचा, अन्नधान्याचा, पाणी, आदी अनेक समस्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संगीत शाळा खुल्या कराव्यात -
संगीत शाळेच्या माध्यमातून कलाकारांना अर्थार्जन होते. मात्र, या शाळा बंद असल्याने फटका बसला आहे. कलाकार हा कलेतून आपली उपजीविका भागवतो असे नाही. यातून तो श्रोत्यांना आनंद देण्याचेही काम करत असतो. चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम करतो. जे खऱ्या अर्थाने आरोग्याच्या दृष्टीने मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही महत्वाचे आहे. यामुळे त्यांना कार्यक्रमासह संगीत शाळांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच नियमांचे पालन करत संगीत शाळा चालवल्या जाईल, असे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने जिल्हा स्तरावर निर्णय घेऊन कलाकारांना न्याय द्यावा. जेणेकरून हळूहळू याचे अनुकरण इतर जिल्ह्यात होईल. सरकारने आता गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे मत वर्धा जिल्हा कलोपासक संघाचे सल्लागार संजय इंगळे तिगावकर म्हणाले आहेत. या पत्रकार परिषदेत अध्यक्ष शाम सरोदे, सचिव किरण पट्टेवार, यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.