वर्धा - शहरात आज पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. मात्र त्या केवळ दहाच मिनिटे. जून महिन्याचा शेवटचा आठवडा येऊनसुद्धा पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. बळीराजा जोरदार पावसाची वाट पहात आहे. नगारिकांसमोरही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकही जोरदार पावसाची वाट पाहत आहेत.
पावसाची वाट पाहत असलेल्या वर्धेकरांना आज ढगाळ वातावरण झाल्यानंतर जोरदार पावसाची अपेक्षा होती. मात्र केवळ दहा मिनिटे झालेल्या पावसाने दिलासा देण्याऐवजी उलट उकाडाच दिला. समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे काही जणांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.