वर्धा - सेलू तालुक्यातील देहगाव गोसावी या गावच्या मधून नागपूर-मुंबई रेल्वे मार्ग गेला आहे. या मार्गावरील तुळजापूर रेल्वे स्टेशनमुळे गावाचे विभाजन झाले आहे. या गावातील लोकाना जीव मुठीत घेऊन थांबलेल्या रेल्वे गाडीच्या खालून प्रवास करावा लागतो. या जीवघेण्या प्रवासात आतापर्यंत १०० लोकांचा बळी गेले असल्याचे सांगितले जात आहे. या वर तोडगा काढला जात नसल्याने गावकरी सतप्त झाले आहेत. या संदर्भात रेल्वे विभागाला गावकऱ्यांनी २४ फेब्रुवारीला रेल रोको करण्याचा इशार दिला आहे.
या गावाला रेल्वे विभागाने पूल बांधून दिला आहे. मात्र, तो गावकऱ्याना सोयीचा पडत नाही. यामुळे गावाच्या मध्यभागातून एक गेट देण्यात आले होते. हे गेट सुद्धा मागील तीन वर्षापासून बंद करण्यात आले आहे. या बद्दल गावचे सरपंच संदीप वाणी म्हणाले गावातील दुसरा मार्ग शेतकऱ्याच्या जमीनीतून असून त्यासंदर्भात शेतकरी मोबाबद्ल्या अभावी केव्हाही रस्ता बंद करू शकतो. पावसाळ्याच्या दिवसात या मार्गात पाणी भरत असल्याने रहदारी थांबते. या मुळे २१ गावांना याचा फटका बसतो. विशेष म्हणजे दोन भागात विभाजन झालेल्या गावातील दैनंदिन गरजांसाठी नागिरकांना इकडून तिकडे जावे लागत आहे.
रेल्वेचे डीआरएम गावाला देणार भेट -
या प्रकरणी गावकऱ्यांनी इशारा दिल्यानंतर रेल्वेचे डीआरएम या गावाला भेट देणार आहेत. या प्रकरणी विठ्ठल मंदिरात ते नागरिकांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेतून काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.