वर्धा - ऑटो आणि ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना सावळी (बु) फाट्यावर घडली. यामध्ये ७ जण जखमी झाले आहेत. कारंजा येथून सारवाडीला जात असताना रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा ट्रकला धडकडून हा अपघात झाला. यामध्ये रामचंद्र देवराव डोबले (वय, ३४ रा. पिपरी) यांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले रामचंद्र हे आपल्या २ महिन्याच्या मुलीला बघायला जात होते. मात्र, दुर्दैवाने त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
कारंजा येथून सारवाडीला १० प्रवाशी घेऊन रीक्षा (क्र. MH32, B-8018 सावळी (बु)) जात असताना अज्ञात कारने जबर धडक दिली. यात ऑटो चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समोरील ट्रकला जाऊन धडकली. यात ऑटो पलटी झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर ७ प्रवाशी गंभीर जखमी झाले.
या अपघातात ऑटोचालक प्रमोद अरुण केवटे (वय ३०) रवींद्र शेषराव पठाडे (वय ४० रा येनगाव) शीतल संदीप परतेती (वय २३) लोकेश संदीप परतेती (वय २ वर्षे रा सारवाडी) दीपाली प्रवीण जाऊळकर (वय ३२) प्रतीक प्रवीण जाऊळकर (वय १० वर्ष, रा कोंढाळी) सुमित्रा गोपाळ गाडगे (वय ७५ रा. पारडी) प्रवाशी जखमी झाले. या सर्व जखमींना कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. प्राथमिक उपचार करून काहींना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी कारंजा पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विनोद वानखडे, निखिल फुटाणे, निलेश मुंडे, करत आहेत.
मुलीचा चेहरा बघण्यापूर्वी वडिलांचा अपघाती मृत्यू
घरात मुलगी जन्माला आली. कधी आपण आपल्या बाळाला बघायला जाऊ याच आशेवर रामचंद्र दिवस लोटत होते. पण शेतीच्या कामातून वेळ न मिळाल्याने ते जाऊ शकले नाहीत. रामचंद्र शेतीचे कामे आटपून दुपारी सारवाडी येथे असलेल्या पत्नीची आणि २ लहान मुलांची भेट घेण्यासाठी जात होते. पण वाटेतच ऑटोचा अपघात झाला त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.