वर्धा - मलकापूर बोदड येथे अचानक कार समोर आल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
रायपूर येथून औरंगाबादला जात असताना राज्य महामार्गावर पुलगाव जवळील मलकापूर बोदड येथे हा अपघात झाला. भरधाव ट्रक वळण घेत असताना समोरुन येणाऱ्या कारला वाचवताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने सिमेंटचे कठडे तोडत रस्त्याकडेला असलेल्या टॅक्टरला आणि दुचाकीला धडक देत ३ घरांचे नुकसान केले. हा ट्रक राहुल नाईकच्या घराची भिंत तोडत स्वयंपाक घरात शिरला. यामुळे स्वयंपाक खोलीतील साहित्याचे नुकसान झाले. तसेच लगतचे अशोक म्हैसकर यांच्या घराचे नुकसान झाले. तर नारायण नाईक यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरला जबर धडक देऊन एका दुचाकीलाही या ट्रकने चिरडले. सुदैवाने ट्रकने धडक दिल्यावर घराच्या स्वयंपाक खोलीत कोणीच नसल्याने जीवित हानी टळली.
अपघातानंतर नुकसान भरपाई भेटावी म्हणून गावातील लोक एकत्र आले. त्यांनी राज्यमहामार्ग रोखून धरला. यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. तब्बल अर्धा तास रस्ता रोखून धरल्यानंतर पुलगाव पोलिसांनी मध्यस्थी केली. नुकसान भरपाई मिळवून देण्यास मदत करण्याच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी रस्ता रोको थांबवला. यावेळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार आर. एम गायकवाड, विवेक बनसोड, राजू मुबैले सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.