वर्धा - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नागपूर-अमरावती मार्गावरील तळेगाव शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री घडली.
वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे तिघेजण रात्री उशिरा जेवण करण्यासठी थांबले. त्यानंतर ते नागपूरच्या दिशेने जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले. ते जेवण करून नागपूरला विरुद्ध दिशेने जात असताना अज्ञात वाहनांच्या धडकेत ते फेकले गेले असावेत. धडक इतकी जोरात बसली की, दुचाकीचे तुकडे होऊन ते विखुरले गेले. यामध्ये दोघे अकोला जिल्ह्यातील तर एक जण यवतमाळ जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातातील दुचाकी (एमएच 31, डब्ल्यूएस 4753) नागपूर जिल्ह्यात नोंद असलेली आहे.
हेही वाचा - रेती काढताना दोन तरुण यशोदा नदीत बुडाले, शोध मोहीम सुरू
मृतांमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या लोहारा येथील प्रफुल ऊर्फ यश जयकुमार इंगोले (वय 34, पंचशीलनगर), मुकेश ऊर्फ शोबीत फर्माधन सरदार (वय 29, मूर्तिजापूर जि. अकोला) आणि गौतम विष्णू निखाडे (वय 40, तारणखेड, अकोला) या तिघांचा समावेश आहे. तिघांचेही मृतदेह आर्वी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी संदीप महाकाळकर, सागर वानखडे आणि अमोल इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह आणि वाहन बाजूला करत मार्ग मोकळा केला.