वर्धा - पतीच्या आत्महत्येनंतर मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलत महिलेने अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करत स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. हिंगणघाट शहरात घडलेली घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटननेने संपूर्ण हिंगणघाट शहरात एकच खळबळ उडाली. कविता असे महिलेचे तर आराध्य मोहदूर असे मृतक मुलीचे नाव आहे.
कविता हिचा काही महिन्यांपूर्वी पहिल्या घटस्फोटानंतर दुसरा विवाह नरेंद्र मोहदूरे याच्याशी झाला होता. यात सुखी संसार सुरू असतानाच 26 सप्टेंबरला पती नरेंद्र यानेही वर्ध्याच्या एका जिनिंगमध्ये आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कविता मुलगी आराध्याला घेऊन हिंगणघाट येथे माहेरी गेली होती. यात आई बँकेच्या कामानिमित्य गेली असतांना घरात कोणीच नसताना कविताने सुरुवातीला अडीच वर्षाच्या आराध्याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतःही गळफास लावून घेत आत्महत्या केली.
या घटनेच्या अवाघ्या चार दिवसापुर्वीच पती नरेंद्र यानेही मानसिक तणावातून आत्महत्या केली अशीच चर्चा आहे. याच धक्क्यातून कविता स्वतःला सावरू शकली नाही. यामुळे तिला आलेले नैराश्य आणि ताण तणावातून तिने माहेरी घरात कोणी नसता कुठलाही विचार न करता अडीच वर्षाच्या मुलीची हत्या आणि स्वतःला संपवून घेतले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक ठाकरे, पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.