वर्धा - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णसंख्याही वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनही वाढवण्यात आला आहे. जास्तीत जास्त कोरोना संशयितांच्या तपासणी करण्याच्या दिशेने पाऊले उचलली जात आहेत. यासाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आणि सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात कोरोना चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'सोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
वर्ध्यातील रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोग शाळेत पाठवले जात होते. यानंतर नामुन्यांचा अहवाल मिळत होता. मात्र, आता कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जलदगतीने चाचणी व्हावी असे नियोजन केले जात आहे. अद्याप जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही. मात्र, पुढील काळातील खबरदारीसाठी प्रशासन नियोजन करत आहे.
या संदर्भात पत्रव्यवहार झाले असून त्यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध आहे. परवानगी मिळताच चाचणीसाठी लागणारी सामुग्री उपलब्ध होताच चाचणी सुरू केली जाईल, अशी माहिती महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था आणि कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगने यांनी दिली.
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णलायात अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध आहे. ज्यामध्ये ड्राय केमिस्ट्री पद्धतीने तपासणी होते. कोरोना चाचणीसाठी लागणारी मशिनरीही मागवली आहे. परवानगी मिळताच पुढील प्रकिया पूर्ण करून जलदगतीने चाचणीची सोय उपलब्ध होणार आहे.
दोन्ही रुग्णालयातील 9 जणांना प्रशिक्षण -
कोरोना चाचणी प्रयोगशाळेत काम करण्यासाठी एक वेगळी टीम असणार आहे. यामुळे दोन्ही रुग्णालयातून दोन डॉक्टरांसह टेक्निशियन म्हणून सावंगीतून 3 आणि सेवाग्राममधून 4 अशा एकूण 9 जणांना नागपूर येथील एम्स रुग्णलयात प्रशिक्षण दिले जात आहे. पुढील तीन ते चार दिवस हे प्रशिक्षण चालणार आहे.
चाचणी झालेले नमुने -
आत्तापर्यंत नागपूर प्रयोगशाळेत 86 कोरोना संशयितांचे नमुने पाठवण्यात आले. यापैकी 84 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. तर दोघांचे अहवाल येणे बाकी आहे.