वर्धा - राज्य शासनाच्या २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या आदेशाच्या अनुषंगाने शाळांनी पाऊले उचलायला सुरवात केली आहे. तब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थ्यांसाठी शाळेची दारे खुले होणार आहे. पण शिक्षकांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालायत शिक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये किंवा विद्यार्थ्यांना त्याची लागण होऊ नये, यासाठी शिक्षकांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांंनी दिले होते.
जिल्ह्यातील 28 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह -
जिल्ह्यात एकूण ३५८ शाळा आहेत. यामध्ये ३ हजार ३०० शिक्षक आणि इतर कर्मचारी कार्यरत आहेत. यात वर्ग 9 ते 12 या अभ्यासक्रमात शिकणारे हजारो विद्यार्थी जिल्ह्याभरातील सर्व शाळेमध्ये आहेत. एकंदरीत 2850 शिक्षकांची चाचणी घेण्यात आली. यापैकी 28 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही रुग्णसंख्या कमी असली तरी शाळा सुरू झाल्यानंतर यामध्ये भर पडू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे.
दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढला-
मागील काळात कोरोनाची रुग्णसंख्या मंदावली होती. पण सनासुदीच्या काळात केलेल्या दुर्लक्षामळे आता रुग्ण संख्या वाढू लागली आहे. दुसरीकडे दुसऱ्या लाटीचे चित्र देशाच्या इतर भागात दिसत आहे. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.
गर्दी टाळण्याच्या ठिकाणीच गर्दी -
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने बिनधास्तपणा वाढला आहे. यासोबत अनेक रुग्ण हे लक्षण नसणारी आढळून येत आहे. यामुळे उपजिल्हा रुग्णालयात चाचणी करून घेताना समाजिक अंतर ठेवणे गरजेचे होते. परंतु याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.