वर्धा - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले जातात आहे. कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर घरात राहा आणि बाहेर पडणे गरजेचे असेल तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे सांगितले जात आहे. मात्र, जिल्ह्यात अनेक भागात प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी, दंडात्मक कारवाईला सुरवात करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना अडचणींचा सामना होऊ नये. त्यांना वेळेवर सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन शक्य ती पाऊले उचलत आहे. याच आधारावर काही दुकाने खुले करण्यासाठी परवानगी देण्यात आली. यामध्ये मोबाईल शॉपी, इलेक्ट्रॉनिक सामानांची दुकाने, प्लंबर, स्पेअरपार्ट यासारख्या काही दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. पण यासह हॅन्डवाश ठेवणे, हात स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे, याअटी सुद्धा घालून दिल्या आहेत. पण नागरिक या नियम-अटींना पायदळी तुडवत बिनधास्तपणे फिरताना दिसून आले.
याची माहिती उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांना मिळताच त्यांनी शहरात फेरफटका मारला. जे लोक नियमांचे पालन करत नाही, त्यांना 200 रुपयापर्यंत दंड तर, दुकान चालकांना 5 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला. हा दंड केवळ प्रातिनिधिक स्वरूपाचा असून लोकांना शिस्त लागावी, कोरोनापासून बचाव व्हावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे यासाठीच दिला असल्याचे बगळे यांनी सांगितले.
हीच परिस्थिती बँकांपुढेही पाहायला मिळाली. बँकेच्या आवारातही लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता सर्रास नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत होते. यामुळे दिवसरात्र झटणारे पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासनासह शासकीय यंत्रणेच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे.